प्रेमासाठी पतीचा काटा; अभियंत्याच्या हत्येचा पत्नीच मास्टरमाइंड

प्रेमासाठी पतीचा काटा; अभियंत्याच्या हत्येचा पत्नीच मास्टरमाइंड

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या सरकारी अभियंत्याच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या हत्येचा कट त्यांच्या पत्नीनेच प्रियकर आणि भावाच्या मदतीने रचल्याचे समोर आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण विभागात कार्यरत असलेले लक्ष्मण मंडले (वय ५४) हे ५ जून रोजी रात्री ठाण्याहून कराडकडे येत होते. त्यांनी आपल्या पत्नी सारिका मंडले यांना फोनवरून प्रवासाची माहिती दिली होती. मात्र याच माहितीचा वापर करून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.

प्रेमसंबंधातून जन्माला आला कट

पोलीस तपासानुसार, सारिका मंडले हिचे वयाने ११ वर्षांनी लहान असलेल्या प्रथमेश थोरात याच्यासोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कापड दुकानात काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. पतीसोबतचे वाद आणि प्रियकरासोबत राहण्याची इच्छा यामुळे तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.

यासाठी तिने प्रियकर प्रथमेश थोरात याला तब्बल तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

लाईव्ह लोकेशनच्या आधारे पाठलाग

६ जूनच्या पहाटे कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात लक्ष्मण मंडले वाहनातून उतरून घरी जात असताना आरोपींनी त्यांच्यावर कार चढवली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी कार मागे-पुढे करून तीन वेळा त्यांना चिरडले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

हत्या करण्यासाठी प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांनी भाड्याने कार घेतली होती. दरम्यान, सारिका मंडले सतत पतीशी फोनवर संपर्क ठेवून त्यांचे लोकेशन प्रियकराला देत होती. त्याच माहितीच्या आधारे आरोपींनी मंडले यांचा पाठलाग करून हत्या केली.

चौघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला संशयावरून पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे यांनाही अटक केली.

न्यायालयाने सर्व आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!