राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट

Oplus_131072
पुणे – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी क्लीन चिट दिली आहे. सोलापूरकरच्या दोन्ही व्हिडीओ क्लिप पोलिसांनी तपासल्या आहेत. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा, असे आक्षेपार्ह सध्यातरी काहीही आढळून आले नाही, असे अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ दहा दिवसांपूर्वी समोर आला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल
सोलापूरकरने वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे सोलापूरकरविरुद्ध राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
सोलापूरकरच्या घराबाहेर विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. पुणे पोलिसांनी त्याच्या घराबाहेर बंदोबस्त दिला आहे. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले असता त्यांनी सोलापूरकरच्या दोन्ही व्हिडीओत आतापर्यंत गुन्ह्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून येत नाही. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह सध्यातरी काहीही आढळून आले नाही, असे सांगितले.