आता शाळेला जाणंही महागलं! राज्यात स्कूलबसच्या भाड्यात 15 टक्के वाढ

आता शाळेला जाणंही महागलं! राज्यात स्कूलबसच्या भाड्यात 15 टक्के वाढ

पुणे :
शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच राज्यातील पालकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. राज्यभरातील स्कूलबस सेवांच्या शुल्कात 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ जून महिन्यापासून लागू झाली आहे. या निर्णयामुळे शालेय वाहतुकीसाठी स्कूलबसवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या मासिक खर्चात वाढ होणार आहे.

आधीच शाळांचे शुल्क, वह्या-पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे पालक आर्थिक ताणाखाली आहेत. त्यातच आता स्कूलबसच्या शुल्कवाढीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः एका कुटुंबातील दोन किंवा अधिक मुले स्कूलबसने प्रवास करत असल्यास हा अतिरिक्त भार अधिक जाणवणार आहे.

खर्चवाढीमुळे निर्णय

स्कूलबस ओनर्स असोसिएशन (एसबीओए) ने दिलेल्या माहितीनुसार, डिझेल आणि इंधनाच्या वाढत्या किमती, चालक व कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, सुटे भाग, विमा, फिटनेस शुल्क, टोल आणि परवाना शुल्क यांमुळे वाहतूक व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय ई-चलन आणि विविध दंडांचा अतिरिक्त आर्थिक भारही बसमालकांना सहन करावा लागत असल्याने शुल्कवाढ अपरिहार्य झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

सरकारकडे सवलतींची मागणी

शुल्कवाढ टाळण्यासाठी संघटनेने राज्य सरकारकडे विविध सवलतींची मागणी केली होती. शालेय वाहतूक व्यवसायाला कर व विविध शुल्कांमध्ये दिलासा देण्याबरोबरच काही दिवस ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विचारात घेण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले.

पालकांमध्ये नाराजी

शाळा सुरू होताच शिक्षणाशी संबंधित विविध खर्च वाढल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्कूलबसच्या शुल्कात झालेल्या 15 टक्के वाढीमुळे अनेक कुटुंबांच्या बजेटवर परिणाम होणार असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी काही पालकांकडून केली जात आहे.दरम्यान, राज्यभरातील शालेय वाहतुकीच्या खर्चात झालेल्या या वाढीमुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागल्याचे चित्र आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!