
हडपसरमधील उद्यानांतील खेळणी धोकादायक; लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
हडपसरमधील उद्यानांतील खेळणी धोकादायक; लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नऊ उद्यानांमधील खेळण्यांची दुरवस्था; राम मनोहर लोहिया उद्यानात मुलांना दुखापती; नवीन खेळणी बसविण्याची हडपसर नागरी कृती समितीची मागणी
हडपसर : पुणे महापालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकूण नऊ उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी जुनी व नादुरुस्त झाली आहेत. अनेक खेळण्यांचे आयुर्मान संपल्याने ती मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. राम मनोहर लोहिया उद्यानातील खेळण्यांचीही दुरवस्था झाली असून, खेळताना लहान मुलांना दुखापत होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर हडपसर नागरी कृती समितीने महापालिका प्रशासनाला लेखी निवेदन देऊन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व नऊ उद्यानांमधील नादुरुस्त खेळणी बदलून नवीन खेळणी बसविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता पांडुळे यांच्याशी संपर्क साधला असता, नवीन खेळणी बसविण्यासाठी कामाची निविदा काढण्यात आली असून, पुढील आठवड्यात काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, उद्यान विभागाकडून यापूर्वीही अनेकदा काम सुरू करण्याची तोंडी आश्वासने देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याचे समितीच्या सविता हिंगणे आणि मयूर फडतरे यांनी सांगितले.
नऊ उद्यानांतील खेळण्यांची तपासणी होणार का?
उद्यानांमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नादुरुस्त खेळण्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असताना प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. नवीन खेळणी बसवेपर्यंत धोकादायक खेळण्यांचा वापर थांबवावा आणि सर्व नऊ उद्यानांमधील खेळण्यांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
नादुरुस्त खेळण्यांमुळे अपघात होऊन मुलांना दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी पुणे महापालिकेने स्वीकारावी आणि संबंधितांना संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हडपसर नागरी कृती समितीने केली आहे.
पुढील आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होते का? नऊही उद्यानांमधील खेळणी बदलली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

