
पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून
पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून
फुरसुंगीमधील घटना : चौघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क –
पूर्ववैमनस्यातून एका १७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
करण रविंद्र नागटिळक (वय १७, रा. भोसले व्हिलेज, दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची बहीण सोनाली रविंद्र नागटिळक (वय २२, रा. भेकराईनगर) हिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना भेकराईनगर येथील सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पटरीजवळ १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण नागटिळक आणि आरोपी अल्पवयीन असून, त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. करण याच्यावर यापूर्वी एका खुनाचा गुन्हा दाखल होता. अल्पवयीन असल्याने त्याची सुटका झाली होती.
काळेपडळ येथील संशयितांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून करण नागटिळक याला रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या रस्त्यावर गाठले. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि दोन्ही हातांवर लोखंडी हत्याराने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच हल्लेखोर पळून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फुरसुंगी पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

