
पेट्रोल पंपात ५० टक्के भागीदारीच्या नावाखाली २ कोटी ४७ लाखांची फसवणूक
पुणे ,
पेट्रोल पंपात भागीदारी देऊन मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ६९ वर्षीय व्यावसायिकाची २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दोन भागीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन दगडू मोरे (वय ६९, रा. श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी या संदर्भात काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुणवाल सेहगल सोसायटी, हांडेवाडी रोड) आणि कालिदास विजय मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांनी सय्यदनगर (हडपसर) व वैजापूर (औरंगाबाद) येथील ‘मगर फ्युल स्टेशन’ या पेट्रोल पंपाचे भागीदार असल्याचे फिर्यादी मोरे यांना सांगितले. या पेट्रोल पंप व्यवसायात ५० टक्के शेअर्सच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते.
त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मोरे यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून, कुटुंबातील सोन्याचे दागिने मोडून आणि बँक खात्यांमधून टप्प्याटप्प्याने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान एकूण २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये आरोपींच्या व पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात जमा केले.
सुरुवातीला ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान नफ्यापोटी काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आली. मात्र, त्यानंतर आरोपींमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचे सांगत परतावा देणे आणि हिशोब देणे बंद करण्यात आले. फिर्यादी यांनी गुंतवलेल्या पैशांचा वापर आरोपींनी स्वतःची वैयक्तिक कर्जे फेडण्यासाठी, शेअर बाजारात आणि इतर ठिकाणी गुंतवणुकीसाठी केल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बाळू निंबाळकर करत आहेत.

