
सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; 19 जणांवर गुन्हा
फुरसुंगी,
फुरसुंगी परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या 43 वर्षीय महिलेचा जातीय द्वेषातून अपमान केल्याचा तसेच तिच्या अंगावर धावून येत धमकावल्याची घटना घडली आहे. हि घटना फुरसुंगी (ता. हवेली) येथील पांडव दंड परिसरात 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात 17 ते 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार प्रितम सावंत, निलेश सावंत, दिपाली सावंत, अमृता दांडेकर, विलास सावंत, अजित सावंत, निखील सावंत यांच्यासह 10 ते 12 अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनीता चौरंगनाथ धनगावकर (वय 43, रा. कोथरूड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता धनगावकर या फुरसुंगी येथील पांडव दंड, शितळा देवी मंदिरामागील लेन क्रमांक चार येथे त्यांचा मानलेला भाऊ बादल सुभाष पवार यांच्या घरी गेल्या होत्या.
त्यावेळी वरील आरोपी तसेच इतर महिला-पुरुषांनी जातीय द्वेषाच्या मानसिकतेतून सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद आणि अश्लील स्वरूपाची वक्तव्ये करून अपमान केला आहे. तसेच आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करून फिर्यादी सुनीता धनगावकर यांच्या अंगावर धावून गेले. तसेच एमजी हेक्टर कारचे नुकसान केले आहे. या घटनेनंतर धनगावकर यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 352, 324(4) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्या आधारेही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले करीत आहेत.

