गणेश विसर्जनासाठी हडपसर-ससाणेनगरमध्ये वाहतुकीचे निर्बंध

गणेश विसर्जनासाठी हडपसर-ससाणेनगरमध्ये वाहतुकीचे निर्बंध

हडपसर : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर हडपसर, ससाणेनगर आणि काळेपडळ परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने दोन दिवसांसाठी वाहतुकीच्या मार्गात तात्पुरते बदल केले आहेत. गुरुवार (दि. २४) आणि शुक्रवार (दि. २५) सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

काळेपडळ अंडरपास ते ससाणेनगर मेन रोड बंद
काळेपडळ अंडरपास ते ससाणेनगर मेन रोड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी काळेपडळ अंडरपास–समृद्धी सोसायटी–रवी पार्क रोड–हांडेवाडी रोड–ससाणेनगर अंडरपास असा पर्यायी मार्ग वापरावा.

काळेपडळ–नवनाथ चौक मार्गालाही निर्बंध
काळेपडळ ते नवनाथ चौक (गणपती मंदिर), डी-मार्टमार्गे ससाणेनगर मेन रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहनांनी काळेपडळ–तुकाई दर्शन–गोंधळेनगर–हडपसर गाडीतळ मार्गे इच्छितस्थळी जावे.

ससाणेनगर अंडरपासकडूनही वाहतूक वळविणार
न्यू इंग्लिश स्कूल डी.पी. रोड (ससाणेनगर अंडरपास) ते ससाणेनगर मेन रोड हा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक ससाणेनगर अंडरपास–सय्यदनगर–हांडेवाडी रोड–रवी पार्क रोडमार्गे काळेपडळ अंडरपास अथवा ससाणेनगर अंडरपासकडे वळविण्यात येणार आहे.

हडपसरकडून येणारी वाहतूकही वळविणार
हडपसरहून ससाणेनगर रोडने सय्यदनगरच्या दिशेने जाणारी वाहतूक एस.बी.आय. बँकेजवळील डी-मार्टमार्गे काळेपडळच्या दिशेने वळविण्यात येणार आहे.

भाविकांसाठी २६ ठिकाणी पार्किंग
विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरात तब्बल २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने उभी न करता निर्धारित पार्किंगमध्येच वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!