हिंगणे मळा विसर्जन घाटावर अस्वच्छता; सुरक्षा व्यवस्था कुठे?

हिंगणे मळा विसर्जन घाटावर अस्वच्छता; सुरक्षा व्यवस्था कुठे?

कचऱ्याचे ढीग, निर्माल्य कलशाचा अभाव; दोन सुरक्षा रक्षकांसह तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हडपसर : हिंगणे मळा येथील गणेश विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. गणेश विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार असतानाही निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाट परिसराच्या स्वच्छतेचा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विसर्जनाच्या वेळी गर्दी वाढणार असल्याने घाटाच्या धोकादायक भागात नागरिक जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे.

या प्रमुख मागण्या

– घाट परिसरातील साचलेला कचरा तातडीने हटवावा.
– पुरेशा संख्येने निर्माल्य कलश ठेवावेत.
– निर्माल्य नियमितपणे संकलित करून स्वतंत्र विल्हेवाट लावावी.
– घाटावर किमान दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत.
– धोकादायक भागात बांबू व अडथळे लावून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवावे.
– धोक्याचे सूचना फलक लावावेत.
– घाटावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी.
– विसर्जन काळात नियमित स्वच्छता व देखरेख ठेवावी.

२४ तासांत कार्यवाहीची मागणी

नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब असल्याने वरील उपाययोजनांची अर्ज प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांनी द्यावी, अशीही मागणी आहे.

आरु फाऊंडेशनचे नितीन आरु यांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन देऊन विसर्जन घाटाची स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!