सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी दरीत कोसळली

सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी दरीत कोसळली

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा समावेश; जखमींवर चौफुला व लोणी येथे उपचार | युगेंद्र पवारांची घटनास्थळी पाहणी

बारामती,
दौंड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन बारामतीच्या दिशेने निघालेली एसटी बस बुधवारी (दि. १६) सकाळच्या सुमारास सुपे घाटातील दरीत कोसळून अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमी विद्यार्थ्यांवर चौफुला येथील हर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि लोणी येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

एमएच २० बीएल ३१२१ क्रमांकाची ही एसटी बस पाटस ते बारामती या मार्गावर धावत होती. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुपे घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरून घसरून दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर चौफुला येथील हर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, तर काहींवर लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

युगेंद्र पवारांकडून घटनास्थळाची पाहणी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चौफुला येथील हर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार तातडीने मिळावेत यासाठी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली.

युगेंद्र पवार म्हणाले, “शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस सुपे घाटातील दरीत कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जखमी विद्यार्थ्यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली असून, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. जखमी झालेले विद्यार्थी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

दरम्यान, अपघातातील जखमी विद्यार्थ्यांची नेमकी संख्या, त्यांच्या दुखापतींची तीव्रता आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. एसटी बसची तांत्रिक स्थिती, चालकाचे नियंत्रण सुटण्याचे कारण तसेच घाटातील रस्त्याची परिस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!