
50 फूट उंचीवर दोन तास अडकले मुले-पालक
अमेरिकेतील अॅडव्हेंचरलँड मनोरंजन उद्यानातील घटना; अग्निशमन दलाच्या मदतीने सर्वांची सुखरूप सुटका
न्यूयॉर्क, ता. 21 : अमेरिकेतील लॉन्ग आयलंड येथील अॅडव्हेंचरलँड मनोरंजन उद्यानात शुक्रवारी रात्री थरारक प्रसंग घडला. “वेव्ह ट्विस्टर” ही राईड अचानक बंद पडल्याने त्यामधील मुले व पालक तब्बल 50 फूट उंचीवर हवेतच अडकून पडले. सुमारे दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
फार्मिंगडेल येथील अॅडव्हेंचरलँडमध्ये नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. दरम्यान, वेव्ह ट्विस्टर राईड सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि राईड अचानक थांबली. त्यामुळे राईडमधील प्रवासी हवेतच अडकून पडले. त्यात लहान मुलांसह अनेक पालकांचा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथके आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राईडची उंची आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बचावकार्य अत्यंत सावधगिरीने राबविण्यात आले. विशेष उपकरणांच्या सहाय्याने एकामागून एक सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक प्रवासी भीतीमुळे हादरले होते. दोन तासांहून अधिक काळ हवेत अडकून राहिल्याने काहींना मानसिक तणावाचाही सामना करावा लागला.
दरम्यान, राईडमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास सुरू करण्यात आला असून संबंधित राईड तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन उद्यानांतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

