
कल्पवृक्ष पतसंस्थेचा सभासदांना १३ टक्के लाभांश
फुरसुंगी,
कल्पवृक्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेने आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाख रुपयांचा नफा मिळविला असून सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर केला. तसेच, संस्थेला लेखापरीक्षणात अ वर्ग मिळाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी यांनी दिली.
सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी, राजेंद्र जैनक व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगरसेवक रमेश निवंगुणे यांनी केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले, की संस्थेला या वर्षी लेखापरीक्षणात १अ वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेला २ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा, तसेच सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचा एकूण निधी १२ कोटी ६१ लाख रुपये, तर ठेवी ३४ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कल्पवृक्ष परिवाराच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष सरोदे, पुरंदर तालुक्याचे माजी सभापती रमेश मोकाशी, फुरसुंगी ग्रामोपाध्याय नंदू काका राहणे व सतीश जगताप यांना कल्पवृक्ष समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरसेवक रमेश निवंगुणे यांना कल्पवृक्ष भूषण पुरस्कार, तर नगरसेवक गणेश ढोरे, ओंकार कामठे, प्रशांत भाडळे, गणेश कामठे व अमृता कामठे यांना कल्पवृक्ष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय राजाभाऊ सूर्यवंशी यांना आदर्श संचालक पुरस्कार, तर अरुण आटोळे यांना आदर्श सभासद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

