मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरण तीर्थक्षेत्र विकास कार्य अहवालाचे प्रकाशन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरण तीर्थक्षेत्र विकास कार्य अहवालाचे प्रकाशन

‘अ’ वर्ग दर्जा व ₹१५२ कोटींच्या विकास निधीनंतर विकासाला गती; भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन……
मुंबई,

संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अरण तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा सविस्तर कार्य अहवाल बुधवारी मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थित होते, तर बहुजन कल्याण, दुग्धविकास व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संत सावता महाराजांचे वंशज गुरुवर्य सावता महाराज वसेकर, ट्रस्टचे सचिव ह.भ.प. प्रभु महाराज माळी, ह.भ.प. साखरचंद महाराज लोखंडे, ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, युवा व्याख्याते अमर हजारे, आबासाहेब खारे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून संत सावता महाराजांचे शेती, अध्यात्म आणि सामाजिक विचार राज्यभर पोहोचविण्याचे कार्य सुरू असून, लोकसहभागातून निधी उभारून अरण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अरण तीर्थक्षेत्राला विशेष ‘अ’ वर्ग दर्जा तसेच ₹१५२ कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संत सावता महाराजांचा विचार हा शेती, माती आणि माणुसकीला जोडणारा आहे. हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अरण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देईल.”
मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कौतुक केले. तसेच अरण तीर्थक्षेत्राच्या भूमिपूजन सोहळ्यास आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संत सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूरहून अरण येथे येणाऱ्या पालखीची व्यवस्था विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात यावी, तसेच संत सावता महाराजांच्या ७७५ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा चरित्रग्रंथ आणि ओवीबंध पारायणाची प्रत राज्य शासनाने प्रकाशित करावी, अशी मागणी करण्यात आली.
अरण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून भविष्यातही आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!