
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशालाही हरताळ; दीड वर्षांपासून वारस नोंद रखडली
चऱ्होलीतील प्रकरणामुळे हवेली महसूल विभागाचा कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; नागरिकांमध्ये संताप
पुणे,
हवेली तालुक्यातील चऱ्होली येथील वारस नोंद प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देऊनही तब्बल दीड वर्ष अंमलबजावणी न झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याने संबंधित वारसांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. यशवंत माने यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी संबंधित शेतजमिनीवरील कायदेशीर वारसांची नोंद घेऊन नोंद हक्क नियमांनुसार निर्णय करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
अपील सुनावणीदरम्यान मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींचे पालन न करता काही फेरफार नोंदी प्रमाणित केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी त्या नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच संबंधित वारसांच्या कायदेशीर नोंदी करण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले होते.
तरीही संबंधित तलाठी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने महसूल विभागातील दिरंगाई आणि निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. “वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशच पाळले जात नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, चऱ्होलीचे ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब राठोड यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील आदेशांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई, जबाबदारी निश्चिती आणि प्रशासकीय शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून वारस नोंदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

