दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण; मैलामिश्रित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण; मैलामिश्रित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

हडपसर :
हडपसर परिसरातील ससाणे नगरमध्ये पिण्याच्या पाण्यात मैलामिश्रित दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ली क्रमांक १ ते १८ मध्ये अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. याबाबत लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही पुणे महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तक्रारीनंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी परिसराची पाहणी करतात, काम करण्याचे आश्वासन देतात; मात्र प्रत्यक्षात समस्या कायमच राहते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील अनेकांना पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि इतर पोटाचे विकार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वैद्यकीय उपचारांवर अतिरिक्त खर्च करावा लागत असून, सुरक्षिततेसाठी पाणी उकळून पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नागरिकांनी महापालिकेकडे दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण शोधून तातडीने दुरुस्ती करण्याची, पाण्याची गुणवत्ता तपासण्याची आणि स्वच्छ पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.

“ससाणे नगरातील नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ महापालिका कधी थांबवणार? या गंभीर समस्येवर प्रशासन तातडीने उपाययोजना करणार की नागरिकांना अशाच दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!