भोरी पाडळ येथे पार्किंगमध्ये पाणी साचले; ४० कुटुंबे वेठीस,

भोरी पाडळ येथे पार्किंगमध्ये पाणी साचले; ४० कुटुंबे वेठीस,

पुणे,
पुणे-सोलापूर रस्त्यालगत भोरी पाडळ येथील अमरदीप सोसायटीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभाराचा फटका रहिवाशांना बसला आहे. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, ड्रेनेज वाहिन्या व चेंबर्सची वेळेवर सफाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पार्किंगमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांची ये-जा ठप्प झाली असून, रहिवाशांना दैनंदिन कामकाजासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सुमारे ४० फ्लॅटधारक या समस्येने त्रस्त असून, प्रत्येक पावसात अशाच संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक नागरिक बाळासाहेब माने यांनी आरोप केला की, ड्रेनेज चेंबर्स तुंबल्याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही संबंधित अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. वेळेवर ड्रेनेज लाईनची साफसफाई झाली असती, तर पाणी साचण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या मते, ड्रेनेज व्यवस्थेच्या देखभालीकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याबरोबरच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालिकेची जबाबदारी

ड्रेनेज वाहिन्यांची नियमित साफसफाई करणे, तुंबलेले चेंबर्स तातडीने मोकळे करणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणे ही पुणे महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, या प्रकरणात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.

नागरिकांची मागणी

अमरदीप सोसायटीतील तुंबलेले ड्रेनेज चेंबर्स तातडीने साफ करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, ड्रेनेज व्यवस्थेची नियमित देखभाल करावी आणि वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यांनी इशारा दिला की, समस्या तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!