
काळेपडळ पोलिसांकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त
हडपसर : काळेपडळ पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी गुटखा, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (COTPA) आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केंजळमळा वस्ती परिसरात सापळा रचून शेराराम कानाराम देवासी (वय २४) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
अधिक तपासादरम्यान आरोपीने हा माल सोणाराम परमार (वय ३३) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी केतकावळे कॉलनी, काळेपडळ येथील एका बंद खोलीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासाहेब बारब, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तसेच काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

