साधना विद्यालयाचा विद्यार्थी भारत सरकार द्वारा वीरगाथा 4.0 स्पर्धेत देशात प्रथम
हडपसर ,
साधना विद्यालय हडपसर येथील इयत्ता 9 वी मधील यश लक्ष्मण कित्तूर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर आयोजित वीर गाथा निबंध स्पर्धा 4.0 या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या विविध ॲक्टिव्हिटी मधून इयत्ता 9 वी ते 10 वी गटातून संपूर्ण देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
या प्रकल्पात देशभरातून 100 उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करण्यात आली.वीर गाथा 4.0 मध्ये विजयी ठरलेल्या सुपर 100 विद्यार्थाचा सत्कार व पारितोषिक (रुपये दहा हजार) 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती व संरक्षण मंत्री यांच्या हस्ते पार पडला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हितगुज साधण्यासाठी आणि ‘परीक्षा पे चर्चा ‘ साठी देशभरातून विविध राज्यातील टॉप 40 विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले.
या चर्चा सत्रात यश कित्तूर या विद्यार्थ्यांस ‘टॉयलेट’ या सामाजिक विषयावर आधारित चित्रपटामधील सुप्रसिद्ध कलाकार भूमी पेडणेकर व 12 वी फेल या चित्रपटात नायक म्हणून भूमिका राबविलेले कलाकार विक्रांत मॅसी यांच्यासोबत विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी करून घेतले .
यश कित्तूर या विद्यार्थ्यास साधना विद्यालयातील निबंध विभागप्रमुख प्रियांका राठोड व वर्गशिक्षिका सविता माने यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग पुणे – विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे , विभागीय अधिकारी संजय मोहिते,सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड,संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे,अरविंद तुपे,साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,पर्यवेक्षिका माधुरी राऊत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.