ग्लायडिंग सेंटर नागरिकांसाठी खुले राहावे
हडपसर: हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना व्यायाम आणि तरुणांना खेळण्यासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच येथील नागरिकांठी पूर्वीप्रमाणेच ग्लायडिंग सुरू ठेवावे. यासाठी ज्या काही गोष्टी करणे आवश्यक आहेत त्या कराव्यात, अशी मागणी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मारुती तुपे तसेच भाजपचे शहर उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची पुण्यात भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. येथील ग्लायडिंग सेंटरचे खासगीकरण होत असल्याची चर्चा निरर्थक असून सेंटर हे याच विभागाकडे राहणार आहे.
केंद्र सरकारचे प्राधिकरण काम पाहणार आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्याचे मारुती तुपे व जीवन जाधव यांनी सांगितले. मारुती तुपे म्हणाले की, ग्लायडिंग सेंटरचा उपयोग विमान प्रशिक्षण घेण्याबरोबरच येथील लाखो नागरिकांना सकाळच्या वेळी व्यायामासाठी व सुट्टीच्या दिवशी मुलांना खेळण्यासाठी होतो.
हे सेंटर सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले राहावे, अशी मागणी मंत्री महोदयांकडे केली आहे. जीवन जाधव म्हणाले की, ग्लायडिंग सेंटर हे कोणत्याही खासगी संस्थेला दिले जात नसून ते याच विभागाच्या प्राधिकरणाकडे राहणार आहे. येथील सेंटरचा वापर प्रशिक्षणाबरोबरच नागरिकांच्या व्यायाम व खेळण्यासाठी व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे.
हडपसर परिसराची महत्त्वाची ओळख असलेल्या ग्लायडिंग सेंटरचे खासगीकरण करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असे माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सांगितले. पुणे हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना मारुती तुपे व जीवन जाधव.