
काळेपडळ पोलिसांनी केली दोन गावठी पिस्तुले, मॅगझिन, जिवंत काडतुसे जप्त
हडपसर, काळेपडळ पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील व तडीपार आरोपींविरोधात मोठी कारवाई करत दोन गावठी बनावटीची पिस्तुले, चार मॅगझिन आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भारती, गणेश बबन लोंढे आणि त्यांच्या साथीदारांकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
हेवन पार्क ते लक्ष्मी पार्कदरम्यानच्या कच्च्या रस्त्यालगत संशयितांवर नजर ठेवून पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये आकाश भारती आणि त्याचा साथीदार दिपक राम बिष्ट यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, अतिरिक्त मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपी गणेश लोंढे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता.
पोलिसांनी पुढील तपास करून ४ जून रोजी गणेश लोंढे याला तरवडे वस्ती परिसरातून अटक केली. त्याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तूल, अतिरिक्त मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आकाश भारती (वय २७), दिपक बिष्ट (वय २०) आणि तडीपार आरोपी गणेश लोंढे (वय २५) यांच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

