
येवलेवाडीत नराधम आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मना न्यूज नेटवर्क
कोंढवा,
Yeolewadi येथे अवघ्या चिमुकल्या मुलीवर तिच्याच आजोबांकडून झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि शहरातील अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने खडीमशीन चौक, कोंढवा येथे तीव्र जनआक्रोश मोर्चा आणि आंदोलन करण्यात आले. संतप्त महिलांनी आणि शिवसैनिकांनी “आरोपींना फाशी झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Kondhwa परिसरातील खडीमशीन चौकात झालेल्या या आंदोलनात महिला आघाडी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, युवा सेना आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “चिमुकल्यांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजेत”, “विकृत नराधमांना कठोर शिक्षा द्या”, “मुली सुरक्षित कधी होणार?” अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.
नसरापूर, पर्वती आणि आता येवलेवाडी येथे सलग घडणाऱ्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
“चिमुकल्या मुली स्वतःच्या घरात आणि नात्यात सुरक्षित नसतील, तर हे समाजाच्या नैतिक अधःपतनाचे भयंकर लक्षण आहे,” असा संताप महिलांनी व्यक्त केला. विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चायानंतर संतप्त शिवसैनिकांनी खडीमशीन चौकातून येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये “झिरो टॉलरन्स” धोरण लागू करावे, दोषींवर कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
“पुणे शहरात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना समाजमन सुन्न करणाऱ्या आहेत. मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नसतील, तर हा संपूर्ण समाजासाठी लाजेचा विषय आहे. पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही, तर शिवसेना आणखी तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
पोलिसांची माहिती
यावेळी येवलेवाडी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून सर्व पुरावे संकलित करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.
आंदोलनात प्रमुखांची उपस्थिती
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शन त्रिगुणाईत, माजी नगरसेविका संगीता ठोसर, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, पंकज कोद्रे, सुभाष घुले, सचिन नाना तरवडे, दत्ता खवळे, सुहास पडवळ, प्रवीण हिलगे, नवनाथ निवंगुणे, संदेश पावसकर, संदीप शिंदे, अभिजित बोराटे, अकबर शेख, अनिकेत सपकाळ, मार्तंडराज धंदुके, सचिन भानगिरे, प्रशांत डाबी, संतोष जाधव यांच्यासह महिला आघाडी, युवा सेना, विविध संघटनांचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र नामाचे प्रश्न
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना थांबणार कधी?
घर आणि नातेसंबंधही सुरक्षित राहिले नाहीत का?
आरोपींना तातडीने कठोर शिक्षा का होत नाही?
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची ठोस कृती कुठे आहे?
येवलेवाडीतील या घटनेने केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजमनाला हादरा दिला आहे. “चिमुकल्यांवरील अत्याचारांविरोधात आता समाज शांत बसणार नाही,” असा स्पष्ट इशारा या जनआक्रोश मोर्चातून देण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे, जलद न्याय आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांची आता अधिक तीव्रतेने मागणी होत आहे.

