
पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या कामकाजाची चौकशी करा!
पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या कामकाजाची चौकशी करा!
कामगारांची प्रत्यक्ष संख्या, हजेरी आणि वेतनाबाबत पारदर्शकता आणण्याची नगरसेवक गणेश कल्याणकर यांची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या नियुक्त्या, प्रत्यक्ष उपस्थिती आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी केली आहे.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची अधिकृत संख्या किती आहे? त्यापैकी प्रत्यक्ष किती कामगार कामावर हजर असतात? कामगारांना नियमानुसार वेतन आणि आवश्यक सुविधा मिळतात का? असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कामगारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची नियमित तपासणी, हजेरीसाठी डिजिटल प्रणाली लागू करणे, कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आणि ठेकेदारांचे नियमित लेखापरीक्षण करणे यांचा समावेश आहे.
तसेच कामगारांच्या नियुक्त्या आणि ठेकेदारांच्या कामकाजात पारदर्शकता असावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कल्याणकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह!
कंत्राटी कामगारांच्या नावावर महापालिकेकडून होणारा खर्च आणि प्रत्यक्ष कामावर असलेली मनुष्यबळाची संख्या यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या निधीचा योग्य विनियोग होत आहे का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी भूमिका नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी मांडली आहे.
आता या मागणीची महापालिका प्रशासन कितपत दखल घेते आणि कंत्राटी कामगारांच्या नियुक्त्या व ठेकेदारांच्या कामकाजाची चौकशी करण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

