
टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आकर्षक आकाशकंदील !
हडपसर–मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचा पर्यावरणपूरक उपक्रम; ‘टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पनेतून पुनर्वापराचा संदेश
हडपसर : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत आकर्षक आकाशकंदील लावले जात असताना, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून सुंदर आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमातून प्लास्टिकचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे.पुणे महापालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य विभागाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. वापरानंतर कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार करता येतात, हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले आहे.
या उपक्रमात सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री महेंद्र सावंत नवनाथ शेलार, सचिन लडकत, आरोग्य निरीक्षक नानासो गवळी, नितीन गायकवाड, मुकादम सतीश आदमने तसेच जनवाणी संस्थेने सहभाग घेतला.
प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसेच ज्या वस्तूंचा वापर करणे अपरिहार्य आहे, त्यांचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांनी केले.
महापालिकेच्या या उपक्रमातून दिवाळीच्या आनंदासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास प्लास्टिक कचऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.

