डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहा!

डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहा!

पुणे,

शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व कीटकजन्य आजार नियंत्रण विभागाने केले आहे. घरातील पाण्याची साठवणूक, सोसायट्यांमधील स्वच्छता आणि डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.

पाण्याची भांडी झाकून ठेवा

घरातील बादल्या, ड्रम, बॅरल, पिंपे आणि पाण्याच्या टाक्या उघड्या ठेवू नयेत. साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालू शकतात. त्यामुळे पाणी साठवण्याची सर्व भांडी घट्ट झाकणाने किंवा स्वच्छ कापडाने पूर्णपणे झाकून ठेवावीत. केवळ पाणी बदलणे पुरेसे नसून, नवीन पाणी भरण्यापूर्वी भांडी आतून घासून स्वच्छ करावीत. डासांची अंडी भांड्यांच्या आतील पृष्ठभागाला चिकटून राहू शकतात, त्यामुळे ही खबरदारी महत्त्वाची आहे.

सोसायट्यांनीही दक्षता घ्यावी

गृहनिर्माण सोसायट्यांनी जमिनीखालील तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे सुरक्षित असल्याची खात्री करावी. टेरेस आणि सोसायटीच्या आवारात जुने टायर, प्लास्टिकचे डबे, शहाळ्याच्या करवंट्या किंवा इतर टाकाऊ वस्तू साचू देऊ नयेत. अशा वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते.

घरातील फ्रीजच्या ट्रे, कुलर, मनी प्लांट आणि फुलझाडांच्या कुंड्यांखालील ताटल्यांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी. एडीस डास प्रामुख्याने दिवसा चावत असल्याने पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत. दिवसा विश्रांती घेताना मच्छरदाणीचा वापर करावा. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचाही उपाय सुचविण्यात आला आहे.

ताप, थंडी किंवा अंगावर पुरळ आल्यास तपासणी करा

ताप येणे, थंडी वाजणे किंवा अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यू आणि मलेरियाच्या निदानासाठी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये व रुग्णालयांमध्ये मोफत सुविधा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

डासांच्या अळ्या आढळल्यास संपर्क क्रमांक

पाणी साठवलेल्या ठिकाणी डास किंवा त्यांच्या अळ्या आढळल्यास नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी किंवा खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तक्रारीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

अ.क्र.| क्षेत्रीय कार्यालय| संबंधित अधिकारी| मोबाइल क्रमांक
१| येरवडा| श्री. मुरली ताते| ९६०४७८१४९२
२| नगररोड-वाघोली| श्री. विश्वनाथ बोराटे| ७७२००३८७०७
३| ढोले पाटील| श्री. स्वप्नील करंजकर| ९८५०१०३०३१
४| औंध-बाणेर| श्री. गोविंद सातपुते| ९६८९९३४३२०
५| घोले रोड| श्री. गिरीश कळसकर| ९६८९९३२२५४
६| कोथरूड-बावधन| श्री. अमोल हवालदार| ९८३४६१२२६९
७| धनकवडी-सहकारनगर| श्री. विशाल पडवळ| ९८९०९८३९७६
८| सिंहगड रोड| श्री. आनंद चाबुकस्वार| ८३०८०२०९८४
९| वारजे-कर्वेनगर| श्री. फकीर शेख| ९६८९९००८२६
१०| वारजे-कर्वेनगर| श्री. विशाल रुपनर| ९४२३५३३२६९
११| हडपसर-मुंढवा| श्री. निलांबर खरात| ९४२३१३५९६१
१२| हडपसर-मुंढवा| श्री. राजेंद्र धायरकर| ९६८९९००९८१
१३| वानवडी-रामटेकडी| श्री. गणपत शिंदे| ९६५७९८५४३६
१४| कोंढवा-उंड्री| श्री. राजू उकरंडे| ७५७५१७७७०५
१५| विश्रामबागवाडा| श्री. युवराज होले| ८००७७०००८६
१६| कसबा पेठ-भवानी पेठ| श्री. प्रकाश मोरे| ९९७०२६०४५२
१७| बिबवेवाडी| श्री. रोहन चव्हाण| ९५९५०८८८८०

नागरिकांनी ‘पाणी साठवा, पण झाकून ठेवा’ हा संदेश आचरणात आणून घरासह सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवावा. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी नियमित काळजी घ्यावी आणि महापालिकेच्या कीटक नियंत्रण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!