अनंत चतुर्दशीसाठी हडपसर-मांजरी परिसर सज्ज

अनंत चतुर्दशीसाठी हडपसर-मांजरी परिसर सज्ज

२२ गणेशमूर्ती संकलन केंद्रे, ४ विसर्जन घाटांवर व्यवस्था; १९८ अधिकारी-कर्मचारी तैनात

हडपसर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने गणेशमूर्ती संकलन व विसर्जनासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २२ गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि चार गणेश विसर्जन घाट निश्चित करण्यात आले असून, सर्व ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हडपसर परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार असून, अंदाजे २० हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून, संकलित मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सर्व संकलन केंद्रे आणि विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे.

या संपूर्ण व्यवस्थेसाठी एकूण १९८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये कंत्राटी कामगार, मुकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता, वायरमन, बिगारी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वच्छता, आरोग्य, विद्युत व्यवस्था, तांत्रिक कामे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वजण जबाबदारीने कार्यरत आहेत.

आरोग्य विभाग, घनकचरा विभाग आणि विद्युत विभागातील कर्मचारी शुक्रवार आणि शनिवार कार्यरत राहणार आहेत. गर्दीच्या काळात आवश्यक सेवा सुरळीत राहाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांनी दिली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त; संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष

– हडपसर पोलिस ठाणे
– मांजरी पोलिस ठाणे
– फुरसुंगी पोलिस ठाणे
– काळेपडळ पोलिस ठाणे
– वानवडी पोलिस ठाणे
– हडपसर वाहतूक विभाग
– काळेपडळ वाहतूक विभाग
– फुरसुंगी वाहतूक विभाग

या सर्व पोलिस ठाणे व वाहतूक विभागांच्या माध्यमातून गर्दीची ठिकाणे, विसर्जन घाट, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

कायद्याचे पालन करून उत्सवाचा आनंद घ्या

गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी कायद्यानुसार घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे, मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनास सहकार्य करावे आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या समन्वयातून स्वच्छ, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!