
हडपसरच्या ४०० वर्षे जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जन्माष्टमी सोहळा
शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन; शनिवारी गोपालकाल्यानिमित्त काल्याचे कीर्तन
हडपसर : हडपसरमधील सुमारे ४०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. जन्माष्टमी निमित्त शुक्रवारी रात्री १० ते १२ या वेळेत श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन होणार असून, ह. भ. प. श्यामराव कोल्हे महाराज कीर्तन सादर करणार आहेत. यावेळी श्रीकृष्ण जन्माचा पारंपरिक पाळणा सोहळाही होणार आहे.
दरम्यान, शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी गोपालकाल्यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाने मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या २४ तासांच्या अखंड विना पहारेकरी सप्ताहाची सांगता होणार आहे.
या सप्ताहात २४ तास भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम सुरू असून, सप्ताहाच्या सांगतेनिमित्त २४ पहारेकऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गोपालकाल्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हडपसरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक मंदिरातील जन्माष्टमी व गोपालकाला सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक ह. भ. प. माधव मारुती ससाणे यांनी दिली.

