गंज पेठेत मोठा बॅनर कोसळला;  अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर खडा सवाल

गंज पेठेत मोठा बॅनर कोसळला;  अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर खडा सवाल

पुणे : गंज पेठ परिसरात दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मोठा बॅनर अचानक कोसळल्याच्या घटनेने पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र बॅनर नागरिकांच्या अंगावर किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरला परवानगी देण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. असे असताना शहरात वारंवार धोकादायक आणि विनापरवाना जाहिरात फलक उभे राहत असतील, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी नेमके करतात तरी काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

उत्सवांच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर, फ्लेक्स आणि जाहिरात संरचना उभारल्या जातात. याच काळात नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा संरचनांची मजबुती, सुरक्षितता आणि परवानगीची वैधता तपासणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.

मात्र, अनेक वेळा अशा घटना घडूनही विनापरवाना आणि बेकायदेशीर फ्लेक्स-बॅनरकडे अधिकारी-कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

महापालिकेच्या पूर्वीच्या कार्यालयीन आदेशांमध्येही अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर आदींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नियम आणि जबाबदारी स्पष्ट असताना प्रत्यक्षात कारवाई का होत नाही, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

‘सुदैवाने बचावले’ हा सुरक्षिततेचा पर्याय नाही!

गंज पेठेतील बॅनर कोसळण्याची घटना जीवितहानीशिवाय टळली असली तरी केवळ सुदैवावर नागरिकांची सुरक्षा सोपविता येणार नाही. एखादा मोठा फलक गर्दीच्या वेळी नागरिकांवर कोसळला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

पुणे शहरात अनधिकृत होर्डिंग आणि फलकांविरोधातील कारवाई थंडावल्याने त्यांची संख्या वाढत असल्याची बाब अलीकडेच समोर आली आहे. त्यामुळे गंज पेठेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व मोठ्या बॅनर आणि जाहिरात संरचनांची तातडीने तपासणी करण्याची गरज आहे.

फ्लेक्सवर कारवाई कधी? आधी दुर्घटना की आधी तपासणी?

विनापरवाना फ्लेक्स, बॅनर आणि धोकादायक जाहिरात संरचना उभारणाऱ्यांवर केवळ नाममात्र कारवाई न करता दंडात्मक आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अधिकृत जाहिरात फलकांची ओळख पटविण्यासाठी महापालिकेने QR कोडची अंमलबजावणी सुरू केली आहे. या माध्यमातून फलकाचा परवाना, नूतनीकरणाची स्थिती आणि वैधता यासारखी माहिती तपासता येणार आहे. मग शहरातील अनधिकृत फलक शोधण्यासाठी आणि हटविण्यासाठी प्रत्यक्ष यंत्रणा किती सक्रिय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात?

“अनधिकृत फ्लेक्स-बॅनर उभारले जात असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना ते दिसत नाहीत का? कारवाई करण्यासाठी एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का?” असा खडा सवाल नागरिकांनी केला आहे.

महापालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गंज पेठेसह संपूर्ण शहरातील धोकादायक आणि विनापरवाना बॅनर, फ्लेक्स व जाहिरात संरचनांची विशेष मोहीम राबवून तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

उत्सवाचा उत्साह कायम राहू द्या; मात्र नागरिकांच्या जीवाची किंमत मोजून नाही. दुर्घटना घडण्यापूर्वी कारवाई करा, अन्यथा एखाद्या मोठ्या अनर्थानंतर जबाबदारी निश्चित करण्याला अर्थ उरणार नाही.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!