रक्ताचे नाते नसले तरी आपुलकीचा धागा; अनाथाश्रमात रक्षाबंधन उत्साहात

रक्ताचे नाते नसले तरी आपुलकीचा धागा; अनाथाश्रमात रक्षाबंधन उत्साहात

हडपसर : रक्ताचे नाते नसले तरी प्रेम, जिव्हाळा आणि परस्परांच्या सुरक्षेची भावना जपणारा रक्षाबंधन सोहळा तुकाई दर्शन येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान संचालित अनाथाश्रम व वृद्धाश्रमात उत्साहात पार पडला.

अनुलोम हडपसर भाग, जनसेवा न्यास आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमातील मुला-मुलींनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. मुलींनी मुलांच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर मुलांनीही बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी निभावण्याचा संकल्प केला. यावेळी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विशेष म्हणजे जनसेवा न्यासच्या शिक्षिका सुप्रिया मारकड (आकुताई), अक्षता गरुड आणि समर्थ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या मुला-मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या होत्या.

अनाथाश्रमाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक मारुती आबा तुपे म्हणाले, “आश्रमातील ही मुलेच एकमेकांचे कुटुंब आहेत. अशा सणांमुळे मुलांमधील बंधुभाव, प्रेम आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते.”

अनुलोम भाग जनसेवक भगतसिंग कल्याणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे शक्तीसिंग कल्याणी, चांदसिंग कल्याणी, सामाजिक कार्यकर्त्या पूजा जाधव यांच्यासह स्वयंसेवक, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. मुलांसाठी अल्पोपहार व खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थितांच्या सहभागामुळे रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!