गुडलक चौकात प्रबोधन; डीजे, प्लाझ्मा, लेझरवर बंदीची मागणी

गुडलक चौकात प्रबोधन; डीजे, प्लाझ्मा, लेझरवर बंदीची मागणी

पुणे : गणेशोत्सवात डीजे, प्लाझ्मा, लेझर आदींच्या वापरामुळे होणारे ध्वनी व प्रकाशप्रदूषण रोखण्यासाठी तसेच अशा आरोग्यविघातक साधनांवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी ‘सुजाण पुणेकर नागरिकांची सभा’ रविवार (३० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता गुडलक चौक येथे आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा नसून ‘डीजेमुक्त उत्सवा’साठी जनजागृती व प्रबोधन सभा असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा अथवा गणेशोत्सव मंडळांच्या विरोधात ही भूमिका नसून, गणेशोत्सव अधिक शांततामय आणि सर्वांसाठी आनंददायी व्हावा, या उद्देशाने नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपण प्रशासनाच्या किंवा गणेशोत्सव मंडळांच्या विरोधात नसून गणपतीच्या बाजूने आहोत. बुद्धीच्या देवतेच्या मार्गावर चालताना उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याचाही विचार झाला पाहिजे,” अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.

सभेचे नियोजन करण्यात आले असून, सभेची माहिती प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सभेबाबतचे पत्र देण्यात आले असून, प्रशासन व पोलिसांचे सहकार्य मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरम्यान, या सभेला काही जणांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. सभेबाबत नकारात्मक पोस्ट करून नागरिकांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्याची संस्कृती, गणेशोत्सव आणि नागरिकांचे आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी सुजाण नागरिकांनी शांततेत आणि जबाबदारीने सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ वीरकर यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!