
‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवरून पुण्यात राजकीय रणकंदन
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस भवनावर हल्लाबोल; सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागण्याची मागणी
पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या समाजमाध्यमावरील ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीचे पडसाद मंगळवारी पुण्यात तीव्र स्वरूपात उमटले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनावर धडकले. जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे आणि सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन काँग्रेस भवनाच्या दिशेने निघाले. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी काँग्रेस भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत बॅरिकेड्स उभारले. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
आंदोलन अधिक आक्रमक होताच पोलिसांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहनातून हलविले. या वेळी काँग्रेसविरोधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
वादाची ठिणगी कशी पडली?
बीड दौऱ्यातील एका व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे एका व्यक्तीला शांत राहण्यास सांगत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत होत्या. हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने “आणखी किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत हा महिलांचा अवमान असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादीची भूमिका
- काँग्रेसने तत्काळ सोशल मीडियावरील पोस्ट हटवावी.
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी.
- महिलांचा अपमान करणारी भाषा थांबवावी.
- अन्यथा राज्यभर काँग्रेस कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सपकाळांचे स्पष्टीकरण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नसून संबंधित घटनेतील भूमिकेचे वर्णन असल्याचे सांगितले. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी आरोपांवर उत्तर देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांनी आपल्या कामातून टीकेला उत्तर द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
राजकीय संघर्ष अधिक तीव्र
या प्रकरणामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून, सोशल मीडियावरील एका पोस्टवरून सुरू झालेला वाद आता थेट रस्त्यावर उतरला आहे. पुण्यातील काँग्रेस भवनासमोरील आंदोलनामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

