
६२ वर्षे जुन्या अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या पुनर्विकासाला मुहूर्त कधी?
२०० खाटांच्या नव्या इमारतीची पाहणी; आरोग्य सुविधा, अस्वच्छता आणि जीर्ण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
पुणे,
हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या प्रस्तावित पाच मजली, २०० खाटांच्या नव्या इमारतीच्या आराखड्याची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मात्र, ही भेट केवळ पाहणी आणि छायाचित्रांपुरतीच मर्यादित राहणार की प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार, असा संतप्त सवाल हडपसरकरांनी उपस्थित केला आहे.
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी रुग्णालयाच्या सध्याच्या कामकाजाचा, उपलब्ध आरोग्य सुविधांचा आणि प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचा आढावा घेतला. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून प्रथम नवीन पाच मजली, २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे आणि त्यानंतरच विद्यमान इमारतीचा पुनर्विकास करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार १९६३ साली उभारण्यात आलेली रुग्णालयाची इमारत आज पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचली आहे. पावसाळ्यात इमारतीत पाणी साचते, भिंतींना गळती लागते आणि रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय, रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. इमारतीच्या छतावर गवत उगवले आहे. उंदीर व घुशींनी परिसर पोखरला असून अनेक वेळा सापांचाही वावर आढळून येतो. अशा धोकादायक परिस्थितीत आरोग्य कर्मचारी जीव मुठीत धरून सेवा बजावत आहेत, अशी गंभीर वस्तुस्थिती नागरिकांनी मांडली.
नागरिकांनी अनेक वेळा लेखी निवेदने देऊन एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी तसेच इतर अत्यावश्यक आरोग्य सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र पुणे महापालिका प्रशासनाकडून या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत भूषण बिराजदार, राजेंद्र राऊत, वैभव डांगमाळी आणि नितीन ससाणे, संतोष होले , चंद्रकांत टिळेकर, तुकाराम ससाणे यांनी व्यक्त केली.
“रुग्णालयाची जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात असताना तिचा विकास करण्यात नेमकी अडचण काय आहे?” असा सवाल ऊर्मिला आरु यांनी उपस्थित केला. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी नव्या इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
“पाहणी दौरे आणि छायाचित्रांपुरतीच ही भेट मर्यादित राहणार की प्रत्यक्षात २०० खाटांच्या नव्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार?” असा प्रश्न हडपसरकरांकडून उपस्थित केला जात आहे. वर्षानुवर्षे आश्वासने, बैठका आणि पाहणी दौरे होत असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा असून महापालिका प्रशासनाने नव्या इमारतीच्या कामाचा निश्चित कालावधी जाहीर करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

