
खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ लाल पाटीवर बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई : खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावून त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्यभर कठोर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी जारी केले आहेत. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काही पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधी खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी लावत असल्याचे निदर्शनास आले होते. अशा पाट्यांचा वापर करून बेकायदेशीर कृत्ये, दहशत निर्माण करणे तसेच तपासणी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी होत्या.
यापुढे खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी अथवा तत्सम फलक लावलेले वाहन आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अन्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस यांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

