शाळेत विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन; व्हायरल फोटोंनंतर संताप

शाळेत विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन; व्हायरल फोटोंनंतर संताप

महापालिका शाळेत विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन; शिक्षण मंदिराचा राजकीय वापर? व्हायरल फोटोंनंतर संताप

पुणे,

पुणे महानगरपालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविका वर्षा साठे यांचे पाद्यपूजन करून घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांचा वापर अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी करण्यात आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अपर इंदिरानगर–सुखसागर परिसरातील महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगरसेविका वर्षा साठे उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान लहान विद्यार्थ्यांकडून त्यांचे पाद्यपूजन करण्यात आल्याची छायाचित्रे समोर आली असून, त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शाळा या संविधानिक मूल्ये, समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशील विचार रुजविण्याची केंद्रे मानली जातात. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांकडून राजकीय लोकप्रतिनिधींचे पाय धुवून घेण्याचा प्रकार घडणे अत्यंत गंभीर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गुरुपौर्णिमा हा गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस असताना, लोकप्रतिनिधींचे पाद्यपूजन घडवून आणणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली? शाळा प्रशासनाने याला मान्यता दिली होती का? शिक्षण विभागाला याची माहिती होती का? विद्यार्थ्यांचा अशा कार्यक्रमासाठी वापर करण्यामागे नेमका उद्देश काय होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी, शाळा प्रशासन आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून आणि नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.

व्हायरल झालेल्या या छायाचित्रांनी शिक्षण क्षेत्रात नवा वाद निर्माण केला आहे. हा प्रकार केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता शाळांमधील शैक्षणिक मूल्ये, प्रशासनाची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. आता शिक्षण विभाग या प्रकरणावर काय भूमिका घेतो आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!