चुकीच्या नियोजनामुळे वाहनचालकांना मनस्ताप; कारवाईची मागणी

चुकीच्या नियोजनामुळे वाहनचालकांना मनस्ताप; कारवाईची मागणी

पुणे ,
पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या निष्काळजी आणि तांत्रिकदृष्ट्या सदोष कामकाजाचा आणखी एक नमुना हडपसरमधील गोपीनाथ मुंडे गार्डन ते ४८ ईस्ट पार्क या मार्गावर समोर आला आहे. रस्त्याच्या उतारावरच गतीरोधक उभारल्याने पावसाचे पाणी डांबरी रस्त्यावर साचत असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या प्रकारामुळे पथ विभागाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्त्यावरील पाण्याचा नैसर्गिक निचरा रोखला गेल्याने प्रत्येक पावसात या ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून, सतत पाणी साचल्याने नव्याने तयार झालेल्या डांबरी रस्त्याचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

हडपसर–हांडेवाडी–महमदवाडी रोड नागरी कृती समितीचे अध्यक्ष अर्जुन सातव यांनी या कामावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

“रस्ते बांधकामातील प्राथमिक तांत्रिक बाबींचा विचार न करता गतीरोधक उभारण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून वाहनचालकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. हा केवळ निष्काळजीपणा नसून सार्वजनिक पैशांची उघड उधळपट्टी आहे. चुकीच्या नियोजनातून पालिकेच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी म्हटले.

सातव यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला, “या कामाचे परीक्षण करणारे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणीला आले होते का? आले असतील तर त्यांना हा उघड तांत्रिक दोष दिसला नाही का? की परीक्षण केवळ कागदावरच झाले?”

या प्रकरणातील कामात कुचराई करणारे अधिकारी, अभियंते आणि संबंधित ठेकेदारांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही पथ विभागाने त्वरित तांत्रिक पाहणी करून गतीरोधकाचे पुनर्नियोजन करावे, पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा निष्काळजी कामांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!