
पुणे–मुंबई कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू
सुरक्षा तपासणीनंतर एमएसआरडीसीचा निर्णय; नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
पुणे ,
पुणे–मुंबई कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)ने दिली.
मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता अशा प्रतिकूल हवामानातही एमएसआरडीसीच्या पथकांनी अखंडपणे काम करून मार्ग सुरक्षित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान प्रभावित भागातील दगड-मातीचा मलबा हटविण्यात आला. अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने संपूर्ण मार्गाची स्वच्छता करण्यात आली. तसेच बोगदा क्रमांक २ आणि लगतच्या उताराची तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करून सैल दगड किंवा इतर धोकादायक घटक नसल्याची खात्री करण्यात आली.
परिसराची पाहणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दाट धुके, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हवाई पाहणीमध्ये अडथळे आले.
सर्व सुरक्षा आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि वाहतूक विभाग तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

