
जीवितहानीची वाट पाहत आहे का बाजार समिती?
मांजरी उपबाजारातील धोकादायक खड्ड्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मांजरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी (शेवाळेवाडी) उपबाजारात सुरू असलेल्या विकासकामांमुळे शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. बाजार परिसरात अनेक ठिकाणी खोल खड्डे खोदून ठेवण्यात आले असून, सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
दररोज हजारो शेतकरी आपला शेतमाल घेऊन या बाजारात येत असतात. भाजीपाला, फळे आणि इतर कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर आवक असते. अशा गर्दीच्या ठिकाणी खोल खड्डे उघडे ठेवून त्यांच्या भोवती साधे लोखंडी बॅरिकेड्स, चेतावणी फलक किंवा सुरक्षारक्षकांची व्यवस्था न करणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्ष पाहणीमध्ये बाजारातील इमारतीलगतच मोठा खड्डा खोदण्यात आल्याचे दिसून येते. या ठिकाणी शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मालाची ने-आण करणारे कामगार सतत वावरत असतात. गर्दीच्या वेळी एखाद्याचा तोल गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकामे करताना सुरक्षेसंदर्भातील नियमावली स्पष्ट असतानाही त्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप होत आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अपघात झाल्यानंतर पंचनामे आणि चौकशा करण्यापेक्षा आधीच सुरक्षा व्यवस्था का उभारली जात नाही? जीवितहानी झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारणार कोण?” असा थेट सवाल केला आहे.
या संदर्भात बाजार समितीचे संबंधित अधिकारी घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “आज माझी साप्ताहिक सुट्टी आहे,” एवढेच उत्तर दिले. मात्र, बाजारात सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत कोणतीही ठोस भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही.
संतप्त शेतकऱ्यांची मागणी
- उघड्या खड्ड्यांभोवती तातडीने लोखंडी बॅरिकेड्स उभारावेत.
- धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावावेत.
- कामाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
- सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी.
प्रश्न कायम…
बाजार समिती प्रशासनाला शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा कामांची घाई महत्त्वाची वाटते का? एखादा निष्पाप शेतकरी किंवा कामगार खड्ड्यात पडून जीव गमावल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता बाजार परिसरातून उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाकडे वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

