विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वाहनचोरी; अडीच लाखांची वाहने जप्त

विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वाहनचोरी; अडीच लाखांची वाहने जप्त

पुणे,  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून अडीच लाखांहून अधिक किमतीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसींग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक वाहन चोरांचा शोध घेत असताना वंडरसिटी रोड परिसरात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरीची रिक्षा आणि दुचाकी उभी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संबंधित बालकाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याच्याकडे असलेली रिक्षा (MH12 QR 3784) आणि दुचाकी (MH12 QQ 7182) चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात त्याने आपल्या साथीदारांसह आणखी एक होंडा शाईन दुचाकी (MH12 KZ 6111) चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये एक तीनचाकी रिक्षा आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत २ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसींग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करत आरोपींकडून चोरीची वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!