
विक्रम काकडे यांचा दुबईत आलिशान फ्लॅट; जय पवारांनाही १० कोटींचे कर्ज
पुणे :
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम संजय काकडे यांची संपत्ती चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, काकडे यांच्याकडे सुमारे १५० कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यांनी अनेक व्यक्ती आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिल्याचेही उघड झाले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. याशिवाय परवेज ग्रँट यांना २.१७ कोटी रुपये तसेच रुस्तुम भरोचा आणि विविध बांधकाम कंपन्यांना मिळून सुमारे ४०.९५ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात आहे.
जंगम मालमत्ता जवळपास ७९ कोटी
काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ७८.९५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये सुमारे ७.५ लाख रुपयांची रोख रक्कम, विविध बँकांमधील २९.५३ लाख रुपयांच्या ठेवी, ४१० ग्रॅम सोने, ५ किलोहून अधिक चांदी, आलिशान घड्याळे, महागड्या गाड्या आणि बोटींचा समावेश आहे.
बांधकाम क्षेत्रातील त्यांची गुंतवणूक सुमारे १५ कोटी रुपये असून, त्यांच्या नावावर जवळपास ५० लाख रुपये किमतीची परवानाधारक शस्त्रे असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्थावर मालमत्तेतही मोठी गुंतवणूक
काकडे यांच्या नावावर ७४.०७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नी देविका काकडे यांच्या नावावर ९.१९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मावळ आणि मुंढवा परिसरात जमिनी, पाषाण येथे ४,५४४ चौरस फुटांची आलिशान सदनिका तसेच पत्नीला भेट दिलेली आणखी एक सदनिका त्यांच्या मालमत्तेमध्ये समाविष्ट आहे.
दुबईतील आलिशान फ्लॅटचीही नोंद
प्रतिज्ञापत्रातील विशेष बाब म्हणजे, विक्रम काकडे यांच्या नावावर दुबईमध्ये आलिशान सदनिका असल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या देशांतर्गत आणि परदेशातील मालमत्तेची एकूण किंमत आणि आर्थिक व्यवहार यांची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या संपत्तीचे तपशील समोर आल्याने हा विषय आणखी चर्चेत आला आहे.

