
मांजरी बुद्रुकमधील विकासकामांसाठी नगरसेविका सारिका घुले व नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांचा पाठपुरावा; २ कोटी ६० लाखांच्या कामांचे प्रस्ताव
मांजरी बुद्रुकमधील विकासकामांसाठी नगरसेविका सारिका घुले व नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांचा पाठपुरावा; २ कोटी ६० लाखांच्या कामांचे प्रस्ताव
प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ते, ओढ्यांवरील कल्व्हर्ट, काँक्रिटीकरण, चेंबर दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध विकासकामांसाठी नगरसेविका सारिका घुले आणि नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांनी केलेल्या मागण्यांनुसार स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांचे वर्गीकरण करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. या कामांना मान्यता देण्यासाठी स्थायी समितीने मुख्य सभेकडे शिफारस केली आहे.
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सारिका घुले व डॉ. दादा कोद्रे यांनी सादर केलेल्या पत्रांच्या अनुषंगाने स्थायी समिती ठराव क्रमांक १३५३, दि. ३० ऑक्टोबर २०२६ नुसार प्रभाग क्रमांक १५ मधील विविध विकासकामांसाठी एकूण १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे वर्गीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या मांजरी बुद्रुक परिसरातील भापकर मळा रोड, वसंतदादा शुगर शेती फार्मजवळील ओढ्यावर कल्व्हर्ट उभारून दोन्ही बाजूंनी रस्ता विकसित करण्यासाठी २५ लाख रुपये, झगडे वस्ती जवळील ओढ्यावर कल्व्हर्ट व दोन्ही बाजूंनी रस्ता विकसित करण्यासाठी २५ लाख रुपये, तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शेती फार्मजवळील ओढ्यावर कल्व्हर्ट व दोन्ही बाजूंनी रस्ता विकसित करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
याशिवाय ग्रीनवुड सोसायटी ए विंग रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये आणि लोकमंगल सोसायटी झेड कॉर्नर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
नवीन सुचविलेली कामेही १ कोटी ३० लाखांची
प्रभाग क्रमांक १५ मध्ये नव्याने सुचविलेल्या कामांमध्ये के. के. धुळे हायस्कूल परिसरातील रस्ता दुरुस्ती, माळवाडी अंतर्गत रस्ते दुरुस्ती, मोरे वस्ती व भापकर मळा परिसरातील रस्ते दुरुस्ती, विविध ठिकाणच्या चेंबरची दुरुस्ती, केशवनगर परिसरातील चेंबर समपातळीत करणे, गावठाण परिसरातील रस्ते दुरुस्ती, ७२ घरकुल परिसरातील रस्ते दुरुस्ती, गोडबोले वस्ती परिसरातील चेंबर दुरुस्ती, गवळे वस्ती परिसरातील रस्ता दुरुस्ती आणि प्रभागात पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी कामांचा समावेश आहे.
या प्रत्येक कामासाठी १० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून, नव्याने सुचविलेल्या कामांची एकूण रक्कम १ कोटी ३० लाख रुपये आहे.
प्रभागातील रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि नागरी समस्यांशी संबंधित विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सारिका घुले व डॉ. दादा कोद्रे यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पुढे आली आहे. आता या प्रस्तावांना मुख्य सभेची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर संबंधित विकासकामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

