
काळे बोराटे नगर परिसरात खळबळ! कुख्यात करण नागटिळक याचा खून
काळे बोराटे नगर परिसरात खळबळ! कुख्यात करण नागटिळक याचा खून
भोसले व्हिलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणाचा मृतदेह आढळला; फुरसुंगी पोलिसांकडून तपास सुरू
हडपसर : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळे बोराटे नगर येथून भोसले व्हिलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख करण नागटिळक अशी असून त्याचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे.
करण नागटिळक हा अल्पवयीन असताना एका खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन असल्याने त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर काळे बोराटे नगर परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा होती.
हातात कोयता घेऊन रात्रीच्या वेळी परिसरातील विविध ठिकाणी फिरतानाचे त्याचे व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या तरुणाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. खुनामागील नेमके कारण काय, हा गुन्हा कोणी केला आणि त्यामागे कोणते कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे काळे बोराटे नगर आणि परिसरात खळबळ उडाली असून, हत्येचे नेमके कारण आणि आरोपींबाबत पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचा तपास सुरू असून, अधिकृत माहितीनंतर या प्रकरणातील पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

