
एफसी रोडवरील अतिक्रमण कारवाईनंतर संपूर्ण पुणे शहरात धडक मोहीम; आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी किती दिवस?
१५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत संयुक्त कारवाईचे आयुक्त नवल किशोर राम यांचे आश्वासन; पुणेकरांचे प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष
पुणे : पुणे शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. या आंदोलनानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या मोहिमेत पुणे पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले अर्थात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून महापालिकेत झालेल्या गदारोळानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईला सुरुवात केली. मात्र, ही कारवाई केवळ आंदोलनानंतर आणि प्रसिद्धीच्या दबावामुळे सुरू झाली आहे की शहरातील सर्व भागांत सातत्याने राबविली जाणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
केवळ एफसी रोडपुरती कारवाई नको!
पुणे शहरातील विविध मुख्य रस्ते, चौक, पदपथ आणि बाजारपेठांमध्ये हातगाड्या, फेरीवाले, अनधिकृत स्टॉल तसेच इतर अतिक्रमणांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ एफसी रोडवर कारवाई न करता शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत समान निकषांनुसार अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, कारवाई करताना पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवणे, रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे.
नागरिकांचे प्रशासनाला प्रश्न!
आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार संपूर्ण पुणे शहरात संयुक्त कारवाई प्रत्यक्षात कितपत होते, किती अतिक्रमणे हटविली जातात आणि कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
**आता प्रश्न एवढाच आहे की, एफसी रोडवरील आंदोलनानंतर सुरू झालेली अतिक्रमणविरोधी मोहीम संपूर्ण पुणे शहरात सातत्याने सुरू राहणार की काही दिवसांनंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार?**
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आणि १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नियमितपणे कारवाई सुरू राहणे, हीच पुणेकरांची अपेक्षा आहे.

