हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

जप्त केलेले फ्लेक्स, फलक आणि लोखंडी सांगाड्यांचा कार्यालय परिसरातच ढीग; महिला स्वच्छतागृहाचा वापरही अडचणीत

हडपसर

पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ चा समावेश होतो. या प्रभागांमध्ये रस्त्यांवर विनापरवाना जाहिरात फलक, फ्लेक्स आणि कार्यक्रमांचे बॅनर लावण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची आहे. मात्र, कारवाईनंतर जप्त केलेल्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तेच साहित्य क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात अस्ताव्यस्त टाकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले फ्लेक्स, जाहिरात फलक आणि लोखंडी सांगाडे कार्यालयाच्या परिसरात बेशिस्त पद्धतीने ठेवण्यात आले आहेत. या साहित्यामुळे कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जागा व्यापली गेली असून, महिला स्वच्छतागृहाकडे जाण्याचा मार्ग अडवला जात असल्याने महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात घोलप यांनी सांगितले की, फ्लेक्स, फलक आणि लोखंडी सांगाड्यांमुळे संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयाची जागा व्यापली गेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंगी आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत रासगे आळी कोठी येथील यंत्रणेवर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुकादम साजन आल्हाट, आरोग्य निरीक्षक गवळी तसेच सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कारवाई करणाऱ्या विभागाने जप्त केलेल्या साहित्याची जबाबदारी कोण घेणार? कार्यालय परिसराची स्वच्छता आणि महिलांच्या स्वच्छतागृहाच्या सुविधेबाबत प्रशासनाला गांभीर्य कधी येणार? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या :

1. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचा संपूर्ण परिसर तातडीने स्वच्छ करावा.
2. जप्त केलेले फ्लेक्स, फलक आणि लोखंडी सांगाडे तातडीने हटवावेत.
3. साचलेले पाणी काढून परिसरातील राडारोडा हटवावा.
4. डास प्रतिबंधक पावडर टाकून औषध फवारणी व धूरफवारणी करावी.
5. महिला स्वच्छतागृहाची दररोज नियमित स्वच्छता करावी.
6. जप्त केलेल्या जाहिरात साहित्याची नियमानुसार साठवणूक व विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.

या मागण्या दीपाली माटे, सीमा शेंडे, सविता हिंगणे, उर्मिला आरु आणि मीना थोरात यांनी केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसर स्वच्छ व आरोग्यदायी करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!