
पुणे मनपा आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस!
दोन अर्ज करूनही नळाला पाणी नाही; एकमेकांकडे बोट दाखवत नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार
हडपसर, हडपसरच्या १५ नंबर परिसरात पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी२० ऑगस्ट २०२५ आणि १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन वेळा लेखी तक्रारी करूनही दोन्ही विभागांनी केवळ अर्जावर शिक्का मारण्यापुरती औपचारिकता पार पाडली आहे. प्रत्यक्षात नळाला पाणी आलेलेच नाही.
कसा आहे भोंगळ कारभार?
१) जबाबदारी ढकलाढकली: हडपसर मनपा अधिकारी सांगतात – “टाकीत पाणी नाही, लष्कर केंद्र पाणी देत नाही.” तर लष्कर विभाग अर्ज घेऊनही गप्प. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत आणि नागरिक मात्र पाण्याविना तडफडत आहेत.
२) १० मिनिटांचे पाणी नाटक: सर्व्हे नं. १४ परिसरात सकाळी ४:३० ते ४:४५ असे केवळ १० मिनिटे पाणी सोडले जाते. १० इंची लाईनला कमी दाब, दुसऱ्या लाईनला पाणीच नाही. हा कसला नियोजनबद्ध पुरवठा?
३) फोन केल्याशिवाय पाणी नाही: नागरिकांनी फोन केला तरच पाणी सोडले जाते, अन्यथा नाही. अधिकारी फोनवर “काम चालू आहे, पाणी येणार नाही” असे सांगून नागरिकांना उद्धट उत्तरे देतात.
४) २००२ पासून तेच रडगाणे: महापालिका स्थापनेपासून १५ नंबरला पाणीटंचाई आहे. गेल्या ५ वर्षात परिस्थिती अधिकच दयनीय झाली आहे. १ तासाच्या नावावर ३० मिनिटे, त्यात १५ मिनिटे लाईन भरण्यात जाते.
दोन्ही विभागांच्या या समन्वयशून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना मूलभूत हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. आवक-जावक, शिक्के, सह्या हा सर्व सोपस्कार झाला, पण नळाला पाणी कधी येणार? असा संतप्त सवाल वसुंधा अधिकारी, सुजाता धोबले, मोना चव्हाण यांच्यासह समस्त १५ नंबर नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहराला आणि हडपसरला पाणी पुरवठा सुरळीत होत आहे, मग आमच्या ५ नंबरच्या भागातच ही समस्या का आहे? आम्ही २० ऑगस्ट २०२५ आणि १८ फेब्रुवारी २०२६ असे दोन अर्ज पुणे मनपा आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाला देऊनही अधिकारी आमच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. आम्ही सर्व नागरिक आज विकत पाणी घेत आहोत. कर भरायचा आणि पाणी विकत घ्यायचे का?आम्ही नागरिकांनी जायचे कोठे? आम्हाला न्याय देणार तरी कोण? आमच्या मूलभूत हक्काचे पाणी आम्हाला का मिळत नाही? पुणे मनपा आणि लष्कर विभागाचा हा भोंगळ कारभार तात्काळ थांबवून आम्हाला नियमित, पूर्ण दाबाने १ तास पाणी द्या, अन्यथा आम्ही सर्व नागरिक आक्रमक आंदोलन छेडू.
शैलेश होले, स्थानिक नागरिक

