ए. एल. नरसिंगराव यांना लोककल्याण भूषण पुरस्कार प्रदान

ए. एल. नरसिंगराव यांना लोककल्याण भूषण पुरस्कार प्रदान

हडपसर,

गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्कमाफी देणारे, तसेच आईची माया नसलेल्या विद्यार्थ्यांना अर्ध्या शुल्कात शिक्षणाची संधी देऊन त्यांच्या आई-वडिलांची भूमिका निभावणारे ए. एल. नरसिंगराव यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तीला पुरस्कार देऊन लोककल्याण प्रतिष्ठानने इतरांनाही समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित २४ व्या लोककल्याण भूषण-२०२६ पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ए. एल. नरसिंगराव यांना लोककल्याण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे मानचिन्ह डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, तर मानपत्र लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी डॉ. सदानंद मोरे यांनाही राजाभाऊ होले यांच्या हस्ते लोककल्याण गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. केजी ते पदव्युत्तर (पीजी) शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असली, तरी नरसिंगराव यांच्यासारख्या व्यक्ती सर्वसामान्यांना माफक शुल्कात शिक्षण उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. अशा व्यक्तींच्या सेवाभावी कार्याला हा पुरस्कार समर्पित असल्याचे लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना ए. एल. नरसिंगराव म्हणाले, “मला मिळालेला हा पुरस्कार मी माझ्या शैक्षणिक कार्याचा गौरव समजतो आणि तो नम्रपणे स्वीकारतो.” यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्राचार्य जयवंत अवघडे, लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप भामे, सचिव इंद्रपाल हत्तरसंग, कोषाध्यक्ष पांडुरंग शेंडे, नगरसेविका प्राची देशमुख, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या लता पाटील, लक्ष्मण निंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप भामे यांनी केले. वर्षा शेंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. टी. पवार यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रकांत वाघमारे, सुभाष कदम, प्रविण होले आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!