हुंड्याच्या मागणीचा आरोप; २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू

हुंड्याच्या मागणीचा आरोप; २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू

चारचाकीसाठी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचा माहेरच्यांचा आरोप; हुंडा प्रतिबंधक कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांकडून तपास सुरू

पुणे, उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय विवाहित IT इंजिनियरचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतरही चारचाकी वाहन खरेदीसाठी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.

विवाहानंतर वैष्णवी काही काळ सासरी राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त ती बंगळुरू येथे गेली होती. जूनअखेरीस ती पुन्हा पुण्यात सासरी आली होती आणि घरूनच IT कंपनीचे काम करीत होती. या काळात पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

२४ सप्टेंबर रोजी रात्री वैष्णवीने आईशी दूरध्वनीवर संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत सांगितल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पतीने माहेरच्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर वैष्णवीशी संपर्क होऊ न शकल्याने तिचे आई-वडील पुण्यात आले असता घटना समोर आली.

या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील आरोपांबाबत अधिक स्पष्टता होणार आहे. काळे पडळ पोलिस उपनिरीक्षक संदीप राऊत हे पुढील तपास करीत आहे

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!