
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ५१ फुटी स्वराज्य गुढीचा दिमाखदार सोहळा
हडपसर,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हडपसर येथील मगरपट्टा चौकात भव्य अशा ५१ फुटी ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . ‘हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर प्रांगणात हा दिमाखदार कार्यक्रम उत्साहात पार पडला .कार्यक्रमाचे संयोजक व अध्यक्ष निलेश मगर यांनी सर्वांचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन सुखदेव शिंदे यांनी शिवराज्याभिषेक दिन हा हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा आणि स्वराज्य, स्वाभिमान तसेच राष्ट्रभक्तीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली.विशेष निमंत्रित हडपसर प्रभाग समिती प्रशांत तुपे आणि नितीन शिंदे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला विधिवत अभिषेक करण्यात आला आणि रयतेच्या सुराज्याचा संकल्प
केला गेला.
या दिमाखदार सोहळ्याला अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्वांच्या हस्ते ५१ फुटी गुढी उभारण्यात आली . या प्रसंगी माजी आमदार महादेव अण्णा बाबर, नगरसेवक मारुती तुपे, पायल विराज तुपे , नितीन गावडे , प्रा नितीन घोरपडे, महेंद्र तुपे , गणेश वाघ , निखिल शिंदे , प्रकाश शिंदे , डॉ कालिदास पाटील उपस्थित होते. मंदिराचे विश्वस्त आणि मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.प्रा. नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले .
मान्यवरांसोबतच मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला संपूर्ण परिसर ‘जय शिवराय! जय भवानी!’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

