
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी जाहिरात फलकांचा मंडप कोसळला
रामानंद कॉम्प्लेक्ससमोरील घटना; दुचाकीची धडक होताच मंडप रस्त्यावर, हडपसर वाहतूक पोलिसांची तत्काळ कारवाई
हडपसर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच गाडीतळ येथील रामानंद कॉम्प्लेक्ससमोरील भागात जाहिरात फलकांचा मंडप रस्त्यावर कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीतळहून हडपसरच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराची जाहिरात फलक लावलेल्या खांबाला धडक झाली. त्यानंतर संपूर्ण मंडप रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी त्या ठिकाणी इतर नागरिक किंवा वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक
गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळांकडून तसेच खासगी जाहिरातदारांकडून संपूर्ण हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारण्यात आले होते. उड्डाणपुलाखालीही दोन्ही बाजूंना खासगी जाहिरातींचे फलक लावण्यात आले होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच जाहिरात फलकांचा मंडप रस्त्यावर कोसळल्याने या फलकांची उभारणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक पोलिसांची तत्काळ कारवाई
जाहिरात फलकांचा मंडप रस्त्यावर कोसळल्याची माहिती मिळताच हडपसर वाहतूक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर पडलेले सर्व जाहिरात फलक तातडीने हटविले. त्यामुळे रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे परिसरात नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असतानाच ही घटना घडली. सुदैवाने जाहिरात फलक कोसळण्याच्या वेळी त्या ठिकाणी इतर नागरिक किंवा वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
सुरक्षेची तपासणी झाली होती का?
गणेशोत्सवाच्या काळात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रामानंद कॉम्प्लेक्ससमोरील जाहिरात फलकांची हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाकडून पाहणी करण्यात आली होती का? संबंधित जाहिरात फलक उभारण्यासाठी आवश्यक परवानगी होती का? तसेच, फलक उभारताना खांबांची मजबुती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची माहिती समोर येणे आवश्यक आहे.
जबाबदारी नेमकी कोणाची?
जाहिरात फलकांचा मंडप रस्त्यावर कोसळल्याने या घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. संबंधित जाहिरातदार, मंडप उभारणारा कंत्राटदार तसेच परवानगी आणि तपासणीची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणेची भूमिका तपासण्याची गरज आहे.
सुरक्षेच्या निकषांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती किंवा मंडप कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई केली जाणार का? असा सवाल स्थानिक नागरिक सुलतान बागवान आणि हिरालाल अगरवाल यांनी उपस्थित केला आहे.
मोठी दुर्घटना टळली; मात्र प्रश्न कायम
रस्त्यालगत उभारण्यात आलेला मोठा जाहिरात फलकांचा मंडप अचानक कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत ही घटना घडल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांची सुरक्षितता आणि मजबुती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकशी करून जबाबदारी निश्चित होणार का?
गणेशोत्सवाच्या काळात हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची परवानगी, उभारणीची पद्धत आणि सुरक्षेची तपासणी याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. रामानंद कॉम्प्लेक्ससमोरील घटनेची चौकशी करून संबंधित जाहिरात फलकाला परवानगी होती का, सुरक्षा निकषांचे पालन झाले होते का आणि घटनेसाठी जबाबदार कोण, हे स्पष्ट करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

