
प्रमाणपत्राशिवाय पगारच नाही! राज्यातील कर्मचाऱ्यांचा माहितीकोष तयार होणार
पुणे, राज्य शासनाच्या सेवेतील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा सर्वंकष कर्मचारी माहितीकोष (EMDB) २०२६ तयार करण्याची प्रक्रिया नियोजन विभागाने सुरू केली आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, १ जुलै २०२६ हा संदर्भ दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत दरवर्षी हा माहितीकोष अद्ययावत केला जातो. यंदा नियमित कर्मचाऱ्यांसह कार्यव्ययी, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी आणि तदर्थ कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा सेवार्थ क्रमांक, नाव, जन्मदिनांक, रुजू व निवृत्ती दिनांक, पॅन, आधार, मोबाईल क्रमांक, ई-मेल, जात, धर्म, भविष्य निर्वाह निधी (GPF), अंशदायी निवृत्तीवेतन योजना (DCPS) तसेच वेतनासंबंधी माहिती नोंदवावी लागणार आहे.
माहितीकोषासाठी महत्त्वाच्या मुदती
– १ जुलै २०२६ — संदर्भ दिनांक.
– २ ते १५ सप्टेंबर २०२६ — आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना (DDO) प्रवेश क्रमांक व संकेतशब्द देण्याची प्रक्रिया.
– १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ — कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन भरून पहिले प्रमाणपत्र घेण्याची मुदत.
– १ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ — त्रुटी दुरुस्त करून अंतिम प्रमाणपत्र घेण्याची मुदत.
– नोव्हेंबर २०२६चे वेतन देयक — पहिले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक.
– फेब्रुवारी २०२७चे वेतन देयक — अंतिम प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक.
प्रमाणपत्राशिवाय वेतन देयक नाही
प्रमाणपत्राशिवाय सादर केलेले वेतन देयक कोषागाराने स्वीकारू अथवा पारित करू नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे. कोषागारामार्फत वेतन देयके सादर न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित संस्था आणि संबंधित कार्यालयांनाही ही प्रक्रिया लागू आहे.
संबंधित कार्यालयांनी निर्धारित मुदतीत कर्मचाऱ्यांची माहिती अचूकपणे भरून ती संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

