
डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न; आरोपीला अवघ्या दोन तासांत बेड्या
पुणे : किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे रूप रक्तरंजित हल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. जी.पी. ग्रीन व्हिला सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत एका ३१ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला काळेपडळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून तपासातील तत्परतेचा प्रत्यय दिला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, गणेश मंदिराशेजारी, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २० जून) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी येथील जी.पी. ग्रीन व्हिला सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत फिर्यादीच्या चुलत भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने मोठा दगड डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जखमी तरुणावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत आरोपी आकाश उर्फ आत्या भरेकर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आरोपीला फरार होण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास सुतार व तपास पथकाने आरोपीला जेरबंद केले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपीला इतक्या कमी वेळात अटक झाल्याने काळेपडळ पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

