प्रभाग ४१ मधील श्रीराम चौक जलमय; पावसाळी वाहिनी कागदावरच ?….

प्रभाग ४१ मधील श्रीराम चौक जलमय; पावसाळी वाहिनी कागदावरच ?….

दरवर्षी पाणी साचून नागरिकांचा जीव धोक्यात, निधीच्या घोषणा भरपूर पण प्रत्यक्ष काम शून्य – हडपसर नागरी कृती समितीचा आरोप

हडपसर : – प्रभाग क्रमांक ४१ मधील हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथे टाकण्यात आलेली पावसाळी वाहिनी नेमकी आहे कुठे? ती कार्यरत आहे की केवळ कागदावरच आहे? असा थेट सवाल हडपसर नागरी कृती समितीने महापालिका प्रशासनाला केला आहे.

श्रीराम चौकात साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे. पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळी वाहिनी असूनही निचरा होत नसेल तर तिची तांत्रिक तपासणी झाली आहे का? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

आठ शैक्षणिक संकुले, तरीही पादचारी मार्ग नाही..

हांडेवाडी रस्त्यावर आठ मोठी शैक्षणिक संकुले, महाविद्यालये आणि अभियांत्रिकी विद्यालये आहेत. हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र, हांडेवाडी आणि महंमदवाडी रस्त्यावर पुरेसे पादचारी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून जावे लागते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे धोका अधिक वाढतो, असे खंडेराव जगताप यांनी सांगितले.

विकास आराखड्यातील १८, २४ आणि ३० मीटर रस्त्यांची अंमलबजावणी कधी होणार? रस्ता रुंदीकरण, पादचारी मार्ग, वाहतूक सिग्नल, दुभाजक यांसारख्या सुविधा कधी मिळणार? असा सवालही त्यांनी केला.

निधीच्या घोषणा, पण विकासकामे कुठे ?…

या भागात निधी उपलब्ध करून दिल्याच्या घोषणा दरवर्षी होतात, मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधा जैसे थे आहेत, असा आरोप अर्जुन सातव, खंडेराव जगताप आणि प्रीतम राऊत यांनी केला आहे.

शोभा लगड – म्हणाल्या, “दरवर्षी श्रीराम चौकात पाणी साचते. मग ड्रेनेज विभागाचे अधिकारी काय काम करतात? आयुक्तांच्या सूचनेनंतरही अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि परिमंडळ उपायुक्तांनी हा प्रश्न का सोडवला नाही?”

दीपाली कवडे यांनी तांत्रिक तपासणीची मागणी केली. त्या म्हणाल्या, “पाण्याचा प्रवाह, वाहिनीची क्षमता आणि निचऱ्यातील अडथळे यांची तपासणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात.”

लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवावा…

या भागातील लोकप्रतिनिधी स्थायी समितीसह विविध समित्यांवर आहेत. त्यांनी रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे, पावसाळी वाहिन्यांसारखे प्रश्न सभागृहात मांडून निधी आणून प्रत्यक्ष कामे सुरू करावीत, अशी मागणी *नाझीम शेख, शराफत पानसरे, अजित ससाणे, रमजान शेख, महेश पवार आणि वैभव माने यांनी केली आहे.

केवळ पाहणी आणि आश्वासने नकोत, तर श्रीराम चौकातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा हडपसर नागरी कृती समितीने दिला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!